पू.गुरुमाऊली यांच्या सानिध्यात सव्वालाख सेवेकरी-भाविकांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य “राष्ट्रीय सत्संग मेळावा व भव्य शिव लिंगार्चन सोहळा” श्री क्षेत्र रामेश्वरम(तामिळनाडू) क्षणचित्रे व अधिक माहिती…!

“समर्थ सेवेकर्‍यांची रामेश्वरास विनवणी, पुन्हा रामराज्य नांदू द्या….!”

प.पू.गुरुमाऊली यांच्या सानिध्यात भव्य-दिव्य राष्ट्रीय सत्संग मेळावा व भव्य शिव लिंगार्चन सोहळा” श्री क्षेत्र रामेश्वरम, संपन्न (क्षणचित्रे व अधिक माहिती)

                 दि.२२ जानेवारी २०१८ रामेश्वर (तामिळनाडू) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि श्रीगुरुपीठ, त्र्यंबकेश्वरच्या वतीने आयोजित शिवलिंगार्चन व राष्ट्रीय सत्संगाच्या निमित्ताने आज गुरुमाऊली प.पू.आण्णासाहेब मोरे यांचे उपस्थितीत सव्वालाख स्त्री-पुरुष सेवेकर्‍यांनी रामेश्वरास साकडे घालून भारतात पुन्हा रामराज्य येऊ द्या ! अशी विनवणी केली. अत्यंत भावपूर्ण, मंगलमय व तेवढ्याच उत्साहात परंतु शिस्तीत झालेल्या सोहळ्यात अनेक स्थानिक अधिकारी, पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

                गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरु असलेल्या या सोहळ्याची तामिळनाडूमध्ये सर्वत्र चर्चा दिसून येत होती. चार धामांपैकी एक आणि ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असलेल्या रामेश्वराचे हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असल्याने व लिंगार्चन, पितृतर्पण, श्रीराम सेतू पूजन असे विविध आध्यात्मिक उपक्रम संपन्न होणार असल्याने भारतभरातून सेवेकरी विक्रमी संख्येने उपस्थित होते.

                आज दि. २२ जानेवारी रोजी भल्या पहाटेच जवळपास दोन लाख स्क्वेअरफुटाचा मंडप सेवेकर्‍यांच्या उपस्थितीने खचाखच भरला होता, भव्य व्यासपीठ, बैठक व्यवस्था, व्यासपीठावरील सोेहळ्याची माहितीदेणारे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी उपस्थित सेवेकर्‍यांनी एक सूरात आरती केली, त्यानंतर श्रीराम सेतू पूजन व मुख्य लिंगार्चन सोहळा संपन्न झाला. सर्व सेवांमध्ये गुरुमाऊलींनी सपत्निक हजेरी लावून सहभाग नोंदविला.

                या निमित्ताने गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे पंचांग २०१८-१९क्षात्रधर्म ग्रंथाचे प्रकाशन केले तसेच सर्वांशी हितगुज केले, ते म्हणाले “आज आपण सर्व भाग्यवान आहात, जन्मोजन्माचे पुण्यसंचय ज्यांच्या जवळ आहे तेच रामेश्वरी येतात व आपल्या भावीपिढ्यांसाठी आशीर्वाद घेऊन जातात. स्वत:साठी रामेश्वराजवळ आशीर्वाद मागायचे आहेतच पण आपण आज भारत माता समृद्ध बनावी, तिचे रक्षण व्हावे यासाठी ही अत्युच्च अशी सेवा करीत आहोत. अतिरेकी कारवाया, युद्ध, महायुद्ध, रोगराई, दुष्काळ, जलप्रलय, भ्रष्टाचार, अनाचार यापासून भारत मातेचे रक्षण व्हावे, देशांतर्गत व बाहेरील शत्रूंपासून तिचा बचाव व्हावा, ती आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावी. देशातील जातीय, धार्मिक, प्रांत वाद, नष्ट होऊन माणूसकीचा धर्म वाढीस लागून पुन्हा रामराज्य यावे. अशा उदात्त हेतूने ही सेवा करीत आहोत.”

 सर्वत्र स्वामीमय वातावरण – या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वत्र स्वामीमय वातावरण तयार झाले. सेवेकर्‍यांनी पर्यटनस्थळांबरोबरच मदुराई, तिरुपती, पद्मनाभन, कन्याकुमारी सारख्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने सर्वत्र सेवेकर्‍यांची उपस्थिती प्रकर्षाने दिसून येत होती.

 

कार्यक्रमाचे व सेवा मार्गाचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी:दिंडोरी प्रणीत ऑफिशियल युटूब चॅनेलला आजच subscribe करा..

https://www.youtube.com/channel/UC5mIaJno_3MmoNbn0NWwwJg?view_as=subscriber

Check Also

राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ युवा महोत्सव २०१८ (अधिक माहिती डाउनलोड करा.)

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ युवा महोत्सव माहितीपत्रक  [ddownload …