तेजोनिधी सद्गुरु प.पू. मोरेदादा पुण्यतिथी (वैशाख शु.१२) (२६ एप्रिल २०१८)

जनसामान्यांना, सेवेकरी, कुटुंबियांना उत्कर्षाकडे, समृध्दीकडे, मोक्षाकडे नेणारे पुण्यपुरुष, प्रचंडसामर्थ्यवान, अपरंपार कर्तृत्वाचे आदर्श असे शिवतेज. श्री स्वामी समर्थांचेच तेजोवलय स्वरुप अर्थात सद्गुरु प.पू.मोरेदादा! भक्त  जन हृदयनिवासा श्री सद्गुरु प.पू. मोरेदादा स्वत:कडे कुणाचेही गुरुपद न घेता श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपदी मानायला शिकविले नव्हे तसा संस्कारच सेवेकरी बालकांवर केला.

आपल्या यशस्वी कृतीतूनच श्री गुरुप्रणीत मार्गाची संस्थापना केली. त्यांचे हे अनंत ऋणच समस्त मानव जातीवर असून, त्यांच्या निष्काम व नि:स्वार्थ कर्माची स्मृती चिरंतन प्रज्ज्वलीत राहून त्यांच्या शुभाशिर्वादाने, स्फुर्तीने, प्रेरणेने प्रेरीत होऊन आयुष्याची वाटचाल करावी.

सद्गुरु प.पू. मोरेदादांच्या चिरंजीव स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा दिवस विशेष उत्सवाच्या रुपात साजरा करावा. तेजोभारीत सद्गुरु प.पू. मोरेदादांचे चरित्र म्हणून साकारलेला तेजोनिधीश्री गुरुगीता इ. ग्रंथांचे पठण करुन, सद्गुरुचरणी सेवेची पुष्पांजली समर्पित करावी.

सर्व केंद्रांमध्ये सकाळी १०:३० च्या आरतीस सामूहिक स्वरुपात हा उत्सव साजरा केला जातो.