परमपूज्य गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण ( एप्रिल २०१९)

परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजातील अमृतकण :

* काही लोकांना आज देवाची गरज वाटत नाही. पण ती कशी वाटेल याचा तरी विचार करावा.

* भगवान चिंतनाने, नामस्मरणाने भासू लागतात. जितकी आग जोरात तितका पाण्याचा मारा अधिक हवा तसे, जितकी देहबुध्दी बळकट तितका ‘श्री स्वामी समर्थ’ या नामस्मरणाचा जोर अधिक पाहिजे.

* नामस्मरणाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला असता अखंड नामस्मरण होईल आणि ते केल्याने, त्याच्या सहवासाने त्याविषयी स्नेह  वाढेल.

* संत देहातीत असतात. त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल. भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही, तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण, गुरुंस गुरुपण आपल्या भावनेनेच येते. तीर्थास जाऊन, ‘आपण निष्पाप होऊ’ अशी भावना असली तरच तीर्थाचे स्नान होईल. सर्व काही भावनेत आहे. नामस्मरण भाव उत्पन्न करते.

* भावयुक्त अंत:करणाने नामस्मरण केले असता आपले काम शीघ्र होते.  साधू होऊन साधूस ओळखावे. साधू सर्वाभूती भगवत्भाव किंवा सर्वत्र ‘मी’ च आहे असा भाव ठेवतात त्यामुळे ते सर्वांवर प्रेम करतात.

* सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे नि:स्वार्थ बुध्दीने योग्य ते करणे. आपण आपलेपनात काहींनाच बघतो तसे न करता सर्वाभूती परमेश्वर बघावा. भावयुक्त अंतःकरणाने नामस्मरण करावे.

अधिक माहितीसाठी : श्री स्वामी सेवा मासिक अंक मे २०१९. संपर्क: (०२५५७) २२१७१०