बलिप्रतिपदा (कार्तिक शु.१ -दि.८ नोव्हेंबर २०१८)

महत्व: 

दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

बलिप्रतिपदेला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा करतात. बळी हा असुर राजा होता. त्याला त्याच्या पदाचा खूप गर्व झाला होता त्याला त्याच्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठीच भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याला पाताळ लोकी पाठविले. काही लोक वामनावताराने गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणतात परंतु शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम हा आहे. त्याची हत्यारे सुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना विदित आहेच. या दिवशी महासती पातिव्रत्य धर्माचे स्मरण म्हणून पत्नीने पतीस अभ्यंगस्नान घालावे व औक्षण करावे. औक्षण करावयाची पध्दत यज्ञविधीमध्ये दिली आहे. सकाळी पतीचे पूजन करून त्यांचे चरणतिर्थ घ्यावे. बलीप्रतिपदेस दिवाळीचा पाडवा म्हणतात.

गोवर्धन अन्नकूट : अन्नाच्या ढीगावर गोपाळकृष्ण ठेवून त्यांची पूजा करावी. गाय म्हणजे लक्ष्मी व खोंड म्हणजे कुबेर समजून त्यांची पूजा करावी. नव्या वहीची पूजा करून जमा-खर्च लिहिण्यास सुरूवात करावी.