लक्ष्मीपूजन-लक्ष्मी-कुबेर पूजन (आश्‍विन कृ.३०- दि.७ नोव्हेंबर २०१८)

*कार्यकारण भाव: बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका, लक्ष्मीकारक व्रतांपैकी एक.

*पूजा साहित्य: गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले (शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कन्हेर, झेंडू इ.) तुळशी पत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, फळे, नैवेद्यास, पुरण पोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, फराळाचे पदार्थ इ. (ग्रंथ-नित्यसेवा, श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक)

*पूजा मांडणी व पूर्वतयारी* पूजेची वेळ सायंकाळी ५:३० नंतर पान क्र. ३० वर दिलेल्या चित्रानुसार प्रदोषकाळापूर्वीच मांडणी करावी. (सायं. ५:३० वा.)

१) देव्हार्‍यासमोर एक मोठा पाट ठेवावा व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे.

२) चित्रात दिल्यानूसार पाटावर स्वस्तिक काढावे (त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुणी ठेवण्यात येईल.) पाटावर डाव्या बाजुला लक्ष्मी नारायण यांची प्रतिमा ठेवावी, त्याच्या समोर दोन स्वतंत्र जोडपानांवर कोजागरी पौर्णिमेस वापरलेल्या देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या सुपार्‍या ठेवाव्यात. त्यानंतर दोन सुक्या खोबर्‍याच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे खडीसाखर व बत्ताशे-साळीच्या लाह्या भराव्यात. त्यानंतर या दोन्ही वाट्या जोड पानावरील सुपारी स्वरुपातील देवतांच्यासमोर ठेवाव्यात.

३) लक्ष्मी नारायण यांच्या प्रतिमेशेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा.

४) त्याच्यासमोरील बाजुस चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे, त्यासमोर एक नारळ ठेवावे. पैसे, सोने, चांदी, फळे, फराळाचे पदार्थ इ. चित्रात दर्शविल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी ठेवावे. पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी, अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढावी. तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढावीत.

५) तद्नंतर देवघर, प्रवेशद्वार, तसेच तुळशीजवळ पणत्या प्रज्वलित कराव्यात.

६) पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावावा, सर्वत्र गोमुत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. टी.व्ही. टेप बंद ठेवावेत.

* पूजन विधी *

सायंकाळी ५:३० वा. पूजेस सुरुवात करावी. पूजेची सुरुवात तुलसी पूजनाने करावी.

१) तुलसी पूजन – प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून, हळद-कुंकू, अक्षता व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी.

(* पंचोपचार पूजा- गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले, धुप, दीप व श्री लक्ष्मी पूजन मांडणी खडीसाखरेचा नैवेद्य) यानंतर एक वेळा तुलसी स्तोत्र किंवा तुलसी मंत्र अकरा वेळा म्हणावा.

 

* तुलसी स्तोत्र *

“तुलसी सर्व व्रतानां महापातक नाशिनी। अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय सदा।

सत्ये सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा। द्वापारे चावतीर्णासी वृन्दात्वं तुलसी कली:॥”

तुलसी मंत्र : ‘‘ॐ र्‍हीं क्लीं ऐं वृन्दावन्यै स्वाहा॥”

२) तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची पंचोपचार पूजा करावी.

३) तद्पश्‍चात प्रवेश द्वाराजवळ यावे, प्रवेशद्वाराची हळद-कुंकू वाहून पूजा करावी.

४) त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यावे, बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी चित्रात दाखविलेल्या जागी ठेवावी. त्यानंतर निम्नलिखित क्रमानूसार पूजा करावी.

* सर्व प्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून श्री स्वामी स्तवन म्हणावे तसेच 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा.

* त्यानंतर महिलांनी स्वत:च्या कपाळाला हळदकुंकू तर पुरुषांनी अष्टगंध लावावा.

* आचमन : भगवान विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम तीन नावांनी पाणी प्राशन करावे व पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे नंतर हात जोडून पुढील नावे म्हणावीत.

१) ॐ केशवाय नम:  २) ॐ नारायणाय नम:  ३) ॐ माधवाय नम: ४) ॐ गोविंदाय नम: ५) ॐ विष्णवे नम: ६) ॐ मधुसुदनाय नम: ७) ॐ त्रिविक्रमाय नम: ८) ॐ वामनाय नम: ९) ॐ श्रीधराय नम: १०) ॐ ऋषिकेशाय नम: ११) ॐ पद्मनाभाय नम: १२) ॐ दामोदराय नम: १३) ॐ संकर्षणाय नम: १४) ॐ वामनाय नम: १५) ॐ प्रद्युम्नाय नम: १६) ॐ अनिरुद्धाय नम: १७) ॐ पुरुषोत्तमाय नम: १८) ॐ अधोक्षजाय नम: १९) ॐ नारसिंहाय नम: २०) ॐ अच्युताय नम: २१) ॐ जनार्दनाय नम: २२) ॐ उपेंद्राय नम: २३) ॐ हरये नम: २४) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नम:

* प्राणायाम *

प्राणायाम करण्यापूर्वी पुढील विनियोग म्हणावा.

‘प्रणवस्य परब्रह्म ऋषि। परमात्मा देवता। देवी गायत्री छंद:। प्राणायामे विनियोग:॥

नंतर खाली दिलेली कृती करावी : प्रथम मधल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्‍वास आत घ्यावा व नंतर अं- गठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणावा.

ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ महा: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यं ॐ तत्सवितुर्वरेण्यम भर्गोदेवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्॥

 

नंतर डाव्या नाकपुडीवरील बोट काढून श्‍वास बाहेर सोडावा व उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून घ्यावा, या क्रियेला प्राणायाम म्हणतात. नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास (प्रथम उजवा) व तोंडास पाचही बोटांनी स्पर्श करावा, व पुढील मंत्र म्हणावा:

‘ॐ आपोज्योतीरसोमृतंब्रम्हभूभुर्वव: स्वरोम्॥

* त्यानंतर हातात पाणी घेऊन निम्नलिखित संकल्प म्हणावा :

संकल्प : ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा/महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्य्र निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्‍वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरू, आई-वडील यांची भक्ती, सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात, कुटुंबात एकोपाराहण्यासाठी यथाशक्ती, यथाज्ञानेन दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे.’

* त्यानंतर श्री गणेश ध्यानमंत्र म्हणावा :

‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:।

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा॥

त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देव्हार्‍यातील श्री गणेश मूर्ती वर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा व नंतर पूजेच्या कलशात गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले वाहून गंगादी सप्त नद्यांचे स्मरण करत नमस्कार करावा.

‘ॐ पुण्डरीकाक्षाय नम:।’

म्हणत पूजेच्या तांब्यातील पाणी सर्व पूजा साहित्य व स्वत: वर शिंपडावे.

* त्यानंतर फक्त कुलदेवतेच्या टाकावर 16 अथवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा (टाक ताम्हणात घ्यावा) व नंतर पुसून जागेवर ठेवून गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले वाहून पूजन करावे.

* त्यानंतर श्री लक्ष्मी ध्यान मंत्र म्हणावा : श्री लक्ष्मी ध्यान मंत्र –

‘ॐ कान्त्या कांचनसंन्निभां हिमगिरी प्रख्यैश्‍चतुभिर्गर्जे। हस्तो त्क्षिप्त हिरण्मय अमृत घटै रासिंचमाना श्रियम्॥

विभ्राणां वरमब्जयुग्मभयं हस्तै; किरीटोज्ज्वलां। क्षौमाबद्धनितम्बबिम्ब ललितां वंदेऽरविन्द्रस्थिताम्॥

* त्यानंतर पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले, तुळशी पत्र वाहून पूजन करावे, धूप दीप ओवाळावा व पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या बत्ताशे, फराळाचे पदार्थ, फळे इ. चा नैवेद्य दाखवावा.

* त्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना म्हणावी.

श्री लक्ष्मी प्रार्थना :

‘त्रैलोक्यपूजिते देवी कमले विष्णूवल्लभे। यथा त्वमचला कृष्णे तथा भव मयि स्थिरा॥

कमला चंचला लक्ष्मीश्‍चला भुतिर्हरिप्रिया। पद्मा पद्मालया सम्यगुच्चै: श्रीपद्मधारिणी॥

धनदायै नमस्तुभ्यं निधी पद्मधिपायच। भूवन्तूत्वत्प्रसादान्मे धन धान्यादि संपदा॥

* त्यानंतर एक वेळा तंत्रोक्त देवी सुक्त वाचावे व सप्तशती ग्रंथातील क्षमाप्रार्थना म्हणावी.

* त्यानंतर सेवाकेंद्रातील क्रमानुसार सायंकाळची आरती करावी. श्री गणपतीच्या आरतीनंतर देवीची आरती म्हणावी. पूजेच्या समाप्ती नंतर अभिषेकाचे तीर्थ सर्व घरात शिंपडावे.

* हे लक्ष्मीकारक व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने खालील विशेष सेवारुजू करावी :

* एक माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्र

* एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र

* एक माळ कमलात्मक मंत्र

* एक माळ ‘श्रीं’ मंत्र

* एक माळ षोडशी मंत्र

* एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र

* एक माळ श्री विष्णूंचा मंत्र

* एक माळ श्री कुबेर मंत्र

* एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र

* एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय, गीतेची अठरा नावे

* एक वेळा व्यंकटेश स्तोत्र

* एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र

* एक वेळा श्रीरामरक्षा अलक्ष्मी निस्सारण : या दिवशी घराची सर्व दारे, खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात तसेच सर्व दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री १२ वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणावे. केरसुणी उंबरठ्यावर आपटावी व तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असतांना ‘अलक्ष्मी नि:सारण’ म्हणावे. यानंतर जर कधी घरात मतभेद, कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरील प्रमाणे कृती करावी. यामुळे घरात आनंद, सुख समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. या दिपावली पर्व काळात अन्नदानादी दानधर्म करावा. श्री माता लक्ष्मींना शांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजविणे टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत.