श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव, दुबई

दिनांक:  १९ ऑक्टोंबर २०१८
देश-विदेश स्वामी सेवा अभियान –
सेवामार्गाच्या दुबई येथील केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवासाठी भारतातुन सुमारे ३५ देश – विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. तसेच दुबई येथील सूमारे ६०० हुन अधिक स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते. सर्वप्रथम भूपाळी आरती, त्यानंतर गणेश व चंडी यागाचे आयोजन केल्या गेले. सकाळी १० वाजता बालसंस्कार वर्गाच्या बालसेवेक-यांनी स्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले. गुरुपुत्र आदरणीय श्री नितिनभाऊंच्या स्वागतासाठी दुबई येथील प्रतिनिधी श्री. रवी काळे, दुबई येथील राजदूत कार्यालयातील श्रीमान मोहम्मद अब्दुला अब्दुल रहीम अहमद उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री स्वामी महाराजांच्या पादुकांसमवेत पवित्र कुराण ग्रंथाचे पूजन स्थानिक अरबी मुस्लिम भाविकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुबई केंद्र प्रतिनिधी श्री. रवी काळे यांनी केले. त्यांनी सेवामार्गाच्या विविध विभागांचा तसेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या कार्याचा गौरव केला.तसेच सेवामार्गातील प्रतिनिधी श्री. इशतीयाक अहमद व श्री. टॉमी अलुकाल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर गुरुपुत्र आदरणीय श्री नितिन भाऊ यांनी मानवी जीवनातील विविध पैलूंची सेवामार्गात कशी सांगड घातली आहे, हे आपल्या हितगुजातून स्पष्ट केले. त्यापैकी काही मुद्दे पुढीलप्रमाणे –
– प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथ एकत्र राहण्याची व एकमेकांना आधार देण्याचीच शिकवण देतो.
– स्वामी महाराजांनी विश्वभ्रमंती करून प्रत्येक धर्मातील शिष्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून समाज उद्धाराचे कार्य करून घेतले आहे.
– स्वामी महाराजांनी प.पु.पिठले महाराजांना सर्व धर्मातील लोकांना मानवतेचा मार्ग दाखवण्याचे व योग्य ते आध्यात्मिक ज्ञान लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सोपविले होते.*
– पिठले महाराजांनी स्वामींच्या सुनियोजित कार्यासाठी ब्र.प.पु.मोरेदादा यांच्याकडून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची स्थापना करून घेतली.
– मोरेदादांच्या महानिर्वानानंतर या स्वामी कार्याची जबाबदारी प.पु.गुरुमाऊली यांनी समर्थपणे उचलली व आज जवळपास ६५०० सेवा केंद्रांच्या माध्यमातुन हे कार्य देशात -विदेशात चालू आहे.
– या कार्यात बालसंस्कार विभागाला खूप महत्व असून आणखी वेगवेगळ्या 18 विभागांच्या माध्यमातून या सेवा कार्याचे काम चालू आहे.
– प.पु. गुरुमाऊलींनी या सर्व विभागाची प्रशिक्षणे व विविध समाज उपयोगी संशोधनं करण्याठीच आध्यात्मिक वारसा लाभलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य श्रीगुरुपीठाची स्थापना केली.
– प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी सेवेकरी प.पु. गुरुमाऊलींचे मार्गदर्शन व हितगुज ऐकण्यासाठी येतात आणि भविष्यात विविध विभागांच्या माध्यमातून करावयाच्या सेवाकार्याची दिशा समजून घेत असतात.
– या सेवामार्गाच्या प्रश्नोत्तर विभागाच्या माध्यमातून विनामूल्य स्वरूपात मानवी समस्या सोडवताना पितृसेवा, कुलदेवता, कुलदेवी यासारख्या सेवाबाबत मार्गदर्शन करून दु:खी – पिडीत भाविकाला समस्यामुक्त केल्या जाते.
– या सेवा मार्गाच्या प्रश्नोत्तर विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मानवी समस्येवर घरच्या घरी करता येईल असे विविध स्तोत्रं-मंत्र-ग्रंथाचे पारायण आदी सेवा कार्यक्रम निःशुल्क स्वरूपात दिले जातात.
– सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना पालकांचा वेळ आणि त्यामुळे संस्कार मिळत नाहीत, त्यांच्या मानसिकतेवर याचा गंभीर परिणाम होत आहे.
– बालसंस्कार विभागातील मुलांना बौद्धिक, शारीरिक, मानसिक दृष्टीने विकसित करण्यात येते. मुलांमध्ये आई-वडीलांबद्दल आदर-प्रेम व कौटुंबिक कर्तव्यं तसेच राष्ट्रप्रेम व आपली सामाजिक जवाबदारी याविषयी जागृती निर्माण केल्या जाते.
– सेवा मार्गाच्या संशोधन विभागाच्या माध्यमातून मानवाचा सर्वांगिन विकास साधणाऱ्या बाबींचा वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून अभ्यास करून ते ज्ञान सर्वसामान्य जणांपर्यंत पोहचविण्याचे कार्य चालू आहे.
– या विभागाच्या माध्यमातून यज्ञ-याग, स्तोत्र-मंत्र यांच्या नियमित अभ्यासाने मानवी जीवनात होणारा शारीरिक, मानसिक, बौद्धिक बदल व अनुभव अभ्यासला जातो.
– विविध स्तोत्र-मंत्र पठणाने मुलांच्या स्मरणशक्तीत झालेली वाढ ही या विभागाच्या प्रयोगाअंती सिद्ध झाली आहे.
– विविध आयुर्वेदिक वनस्पती यांच्या हवनातून व त्या हवनाच्या विभूतीमधून शरीरातील गंभीर आजारांवर मात करता येते.
– वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, आदर्श वास्तू कशी असावी? तसेच सदोष वास्तूंची तोडफोड न करता छोट्या छोट्या उपायांनी त्यावर करावयाची उपाययोजना याविषयी शास्त्रोक्त मार्गदर्शन वास्तुशास्त्र विभागातून केल्या जाते.
– आयुर्वेद विभागाच्या माध्यमातून कॅन्सर, डायबेटीस, हृदयरोग व तत्सम गंभीर आणि खर्चिक आजारांवर आयुर्वेदाच्या उपचार पद्धती व उपायांनी आजार आटोक्यात आणून त्यावर मात करण्याचे मार्गदर्शन केल्या जाते.
– फास्टफूडचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबाबत लोकांना सजग करून सात्विक आहाराचे महत्व याबाबत मार्गदर्शन केल्या जात आहे.
– संख्याशात्र, हस्तशास्त्र -स्वरशास्त्र आदी शास्त्रांचा उपयोग करून शिक्षण क्षेत्र निवड, करियर – व्यवसाय -उद्योग या संबंधी मार्गदर्शन घेऊन मानवी जीवन सुलभ करता येते. सेवा कार्यातर्फे अशा शास्त्रांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण सेवेकऱ्यांना देण्यात येते.
– सेवामार्गाचे चालू असलेले कार्य एक दिवसात सांगणे शक्य नाही. या सेवा मार्गातील ज्ञानाचा स्वतःसाठी उपयोग करून, हा सेवामार्ग इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग व सहकार्य करावे.
– दुपारच्या सत्रात सेवामार्गाच्या विविध विभागांचे मार्गदर्शन स्लाईड शो च्या माध्यमातुन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने बालसंस्कार, गर्भसंस्कार, वास्तुशास्त्र, वेद संशोधन विभाग यांचा समावेश होता.त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांनी पालखी सोहळ्याचा लाभ घेतला आणि सर्वात शेवटी पसायदान, दुबई राष्ट्रगीत आणि भारताच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. दुबई येथील स्थानिक सेवेकऱ्यांनी कार्यक्रमाचे अत्यंत शिस्तबध्द व काटेकोर नियोजन केले होते.