गुढीपाडवा (चैत्र शु.१) मराठी नवीन वर्ष: सेवा व महत्व

गुढीपाडवा (चैत्र शु.१) (दि. ६ एप्रिल २०१९)

या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरूवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठण करावी. चैत्र नवरात्रापासून  चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीची १४/२१ पारायणे करावीत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस “ब्रह्मध्वजारोहण” करतात. म्हणजेच गुढी उभारतात.

कृती :- सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत निंबाचा पाला, चाफ्याच्याफुलांची माळ, साखरीचे कंगण गाठीची

माळ या गोष्टी एक सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे झाकावे. ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर (जवळ) उभी करावी व ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली पाट नैवेद्यासाठी ठेवावा, रांगोळी काढावी, दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. पुढील ध्यान मंत्र गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा.

“ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे । प्राप्तेऽस्मिन्संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू॥”

अर्थ :- ब्रह्माचे प्रतिक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल  व्हावे, ही प्रार्थना. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर “ॐ ब्रह्मध्वजाय नम:।” या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा श्री स्वामी समर्थ सेवा मासिकात दिल्याप्रमाणे करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभारावी. घरतील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील “श्री गणेशाचे पूजन” करावे. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फलवाचावे. दुपारी सर्व शेतकरी सेवेकर्‍यांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सीतामातेचा नैवेद्य पुरावा.

चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकर्‍यांनी वडाच्या झाडाची ३ इंच लांबीची मुळी आणावी. ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ “श्री स्वामी समर्थ” जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते.

या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरी, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून घ्यावे, व ते मिश्रण घरातील सर्व लहान मोठ्यांना द्यावे. कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक, आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक राहिले असले तरी त्याचे नित्य अनाशापोटी सेवन केल्यास शरीर सुदृढ, निरोगी राहते. त्याचा अनेक रोगांवर उपयोग होतो.

या सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करावा. फक्त विवाह व उपनयन (मुंज) यास हा मुहूर्त नाही.

🚩 गुढीपाडवा विज्ञान 🚩

१. ग्रह-ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षण व प्रकाश लहरींचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम जीवसृष्टीवर होतो. चंद्रामुळे सागराला भरती -ओहोटी तर सुर्यामुळे ऋतुचक्र ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. प्रजापति ग्रहाच्या प्रकाश लहरींच्या स्पर्शाने प्रजोत्पादन क्षमता वाढते. प्रजापति च्या लहरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्वाधिक प्रमाणात धरतीवर येतात. त्या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या लोकांना व्हावा म्हणून गुढी उभारण्याची पद्धत रूढ झाली. गुढीवरचा उपडा कलश डिश-अँटिनाचे काम करतो. तो वातावरणात आलेल्या प्रजापतीच्या लहरी खेचून घेतो.गुढीला बांधलेले कोरे वस्त्र बांबूच्या काठीवर हवेमुळे घासले जाऊन निर्माण झालेल्या विद्युतभारात कलशाने खेचून घेतलेली प्रजापतीच्या लहरी एकसंघ होतात व ती घरात प्रक्षेपित होऊन घरातील व्यक्तींना स्पर्श करून बलसंपन्न करतात.

२. प्रजापती लहरींचा स्पर्श शेतीला होऊन शेतीची उत्पादनक्षमता वाढावी म्हणून या महिन्यात शेतकरी शेतीची नांगरणी करतात.

३. या दिवशी रक्तवर्धक मिरे,उत्तेजना व गंध देणारा हिंग, आयोडिनसह क्षारयुक्त मीठ,वातूळ पदार्थांचा त्रास कमी करणारा ओवा,लोह व क्षारयुक्त गुळ, शक्तिवर्धक दही व अनेक रोगांचा नाश करणारा कडूलिंबाचा मोहोर एकत्र करून गुढीचा प्रसाद म्हणून सेवन करतात.

४. आरोग्यम् वाप्तये निंब पत्रम् भक्षणम्।
आयुर्वेदाच्या दृष्टीने कडुलिंब हा पृथ्वी वरचा कल्पवृक्ष आहे. कडुलिंब, गोडलिंब, व महालिंब असे लिंबाचे तीन प्रकार असून कडुलिंबाच्या रसातून पोटाचे विकार दूर करणारे क्विरिसीरिन हे औषध तयार होते म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात करताना कडूलिंबाचा मोहोर व पाने खाण्याचा सल्ला आपले ऋषी-मुनीनी आपल्याला देतात. कडूलिंबाला मेडिकल स्टोअर्स म्हणूनही संबोधिले जाते. दक्षिणेकडे प्रत्येक मंदिराच्या दारात हा वृक्ष असतो. बंगाल मध्ये लिंबवृक्ष तोडणे म्हणजे तरुण मुलीची हत्या करण्याइतके निचकर्म मानले जाते. लिंबवृक्ष ज्या गावात व दारात असतो तिथे साथीचे रोग होत नाहीत. कडुलिंबाच्या पानामुळे धान्य व कपड्याना कीड लागत नाही. पाने, साल, फळ, खोड व फूल
यांना लिंबपंचायतन असे म्हणतात. अशा या बहुउपयोगी वृक्षाची डहाळी गुढीला व दाराला बांधतात.

५. लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मलमलचे कपडे,द्राक्ष मण्याची माळव गोड गाठी घालून शीतल शिमगा संपन्न करतात.

६. वेळूचीच काठी वापरली जाते?

संस्कृत मध्ये वेळूला वंश असे म्हणतात.वेळूची काठी ही वंशाचे प्रतीक म्हणून वापरतात.तसेच रेशीम वस्त्र हे मांगल्याचे प्रतीक म्हणून वापरतात.
ह्या सर्व कारणांमुळे गुढी उभारली जाते.

संकलन :- वेद विज्ञान संशोधन विभाग
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)