सप्टेंबर : सण – वार – व्रत वैकल्ये

* भाद्रपद वद्य पंधरवडा *

महालय (भाद्रपद शु.15 ते अमावास्या)

(दि.14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019)

     या काळाला पितृपक्ष म्हणतात. या महालय काळात मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान, हिरण्यदान त्यांच्या नावाने करावे. सद्गृहस्थास जेवू घालावे. पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त पठण व हवन करावे. नित्यसेवा ग्रंथात दिल्याप्रमाणे महालय कालावधीमध्ये दररोज पितृसुक्ताचे हवन केले तरी चालते. तसेच या दिवशी व प्रत्येक अमावास्येला दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात, थोडे तूप, 5-7 काळे तिळाचे दाणे घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून 1 माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांनाही सद्गती लाभते.

मध्व: सोमास्याधिना मदाय प्रत्नो | होता विवासते वाम ।

बर्हिष्मती रतिर्विश्रिता गीरिषा यांत | नासत्योप वाजै:॥

     श्राद्ध दिवशी या मंत्राचा 1 माळ जप करावा. घरात सवाष्ण स्त्री गेलेली असल्यास अविधवा नवमीस श्राद्ध घालावे. ज्या पितरांची तिथी माहित नाही त्यांच्या नावाने अमावास्येस श्राद्ध घालावे तसेच ब्राह्मणास हिरण्यदान द्यावे व अमावास्या मागणार्‍या स्त्रीला शिधा दान करावे. (पितृपक्षात नारायण नागबली सारखे विधी करू नयेत.)

 

* घटस्थापना / नवरात्र *

(आश्विन शु.1 ते आश्विन शु.9 )

(दि. 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019)

शारदीय नवरात्र घटस्थापना विधी

श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप.

‘ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुऽते।’

     हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी-कुंकू स्वत:च्या कपाळी लावावे.

* खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.

1)  ॐ ऐं आत्मतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

2)  ॐ र्‍हीं विद्यातत्वं शोधयामी नम: स्वाहा।

3)  ॐ क्लीं शिवतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

4)  ॐ ऐं र्‍हीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

* गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.

* संकल्प – ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा / नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड-अचंचल-अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती (संस्कृत/प्राकृत) ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे.’

* श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे. * अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.

1) घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावे, चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.

2) एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी.

3) त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा.

4) घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे, घटावर एका तांब्याच्या अथवा स्टिलच्या ताटलीत तांदुळ भरून ठेवावे.

5) खालील प्रमाणे कुलदेवीची पूजा करावी.

‘ॐ सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते । भयेभ्यस्त्राही नो देवी दूर्गेदेवी नमोऽस्तुते॥’

म्हणून टाकास नमस्कार करावा.

* देवीच्या टाकावर 16/1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा.

* घटावर विड्याची दोन पाने पुर्वेकडे देठ करून ठेवावी, त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा.

* टाकाची पंचोपचार पूजा करावी.

* ध्यान :-

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:।नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्मताम्॥

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:॥ ध्यायम् ध्यायामि। नमस्काराणि समर्पयामि॥

पंचोपचार पूजा –

1) श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। विलेपनार्थेचंदनम् समर्पयामि॥ अलंकारार्थेअक्षताम् समर्पयामि॥ हरिद्रां कुंकुम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि॥

(गंध लावावे, अक्षता वहाव्यात व हळद-कुंकू वहावे.)

2) श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। ऋतुकालोद्भव पुष्पम् समर्पयामि॥ (फुले वहावीत.)

3) श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। धूपम्आघ्रापयामि॥ (धूप ओवाळणे.)

4) श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। दीपंदर्शयामि॥(दीप ओवाळणे.)

5) श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। नैवेद्य समर्पयामि॥ (कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.)

* पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने बांधावी.

‘ॐ मां माले महामाये सर्वशक्ति स्वरूपिणी। चतूर्वर्ग त्वयी न्यस्तं स्तन्मान्मे सिद्धिदा भव॥’

* पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी.

* आरती करावी.

* रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून, घटास माळ चढवावी व आरती करावी.

* नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशती संस्कृत/प्राकृत ग्रंथाचे करावे.

* कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा.

* अष्टमी, नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त  अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे. पुरणाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी.

* नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारीका व सवाष्ण भोजन करवावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा.

* दसर्‍याच्या दिवशी सीमोल्लंघनास जातांना घट, टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले धान्य, आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व

घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रीयांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे.

* घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी.

श्री गायत्री माता उत्सव(दिंडोरी प्रणीत उत्सव)

(आश्विन शु. 9) (दि.7 ऑक्टोबर 2019)

 

     श्री गायत्री माता व गायत्री मंत्र हे आपल्या आर्य धर्मांचे मूळ अधिष्ठान असून आपल्या सेवामार्गाची मूळ देवता आहे. त्यांचा उत्सव वर्षातून फक्त एकदाच होतो, तो म्हणजे आश्विन शुक्ल नवमी. ठिक सकाळी 8 ची आरती झाल्यानंतर प्रत्येक सेवेकर्‍याने 1 माळ गायत्री मंत्र व 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जपावे. ठिक 10.30 ला अन्नाचे 5 नैवेद्य करावे. प्रथम कुलदेवता, दुसरा नारायणाचा या क्रमाने 5 वा गायत्री मातोश्रींचा असे नैवेद्य मांडावे. सकाळच्या तीन व सायंकाळच्या दोन अशा आरत्या म्हणून सर्वांना प्रसाद द्यावा. गायत्री मातेसाठी शुध्द तूप, गुळाचा, गव्हाच्या पिठाचा प्रसाद करावा. (अधिक माहिती ज्ञानदान भाग 1 बघावा.)

सेवा :- गायत्री सहस्त्रनाम, गायत्री जप यांचे वाचन, पठन, हवन करावे.

अग्रयण :- नव्या तांदूळाचा होम करून मगच नवे तांदूळ खाण्यासुरूवात करतात. म्हणून याला ‘नव्याची पौर्णिमा’ म्हणतात. पहिल्या अपत्यास या दिवशी सायंकाळी ओवाळावे.

खंडेनवमी : सर्व यंत्र, मशिनरी व वाहनांचे पूजन करावे.

 

विजयादशमी (दसरा)

(दि. 8 ऑक्टोबर 2019)    

         आश्विन शु. दशमीला  दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला ‘विजयादशमी’ म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र 9 व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात तर काही जण दसर्‍याला उठवतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टी करायच्या असतात. दसरा हा चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरूवातीला तो कृषीमहोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करतांना दिसतात. आजही घटा जवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे. सीमोल्लंघनाला जातांना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. या सर्व गोष्टी कृषीमहोत्सवाचेच महत्त्व सांगतात.

         यापुढे सणाला धार्मिक रूप आले, पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रांची पूजा करतात.  दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल, आमच्या समाजात काही विचित्र रूढी आहेत धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्चनीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही, राहायला घरेही नसतात, अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले आहे, आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे, या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. ‘सीमा ओलांडायची आहे’ म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल खरे सोने आमच्या हाती लागेल. दसर्‍याच्या दिवशी सोने लुटतात.