श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शु. ४) दि. १३ सप्टेंबर

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘महासिध्दी विनायकी’ चतुर्थी म्हणतात. हा श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शु.४ ते भाद्रपद शु. १० (अनंत चतुर्दशी) पर्यंत १० दिवस असतो या चतुर्थीच्या दिवशी ‘सुखकर्ता दुखहर्ता’ अशा गजाननाचे आगमन होते.

भाद्रपदात येती गौरी गणपती। उत्सवा येई बहर ॥ असा बहर सर्वत्र दिसतो.

गणेश चतुर्थीला गणपती घरोघरी बसविले जातात. हे गणपती  दुकानातून विकत न आणता आपल्या शेतातील मातीचा किंवा प्लॉटच्या मातीचा तयार करून त्याला गणपतीचा आकार देऊन त्याची स्थापना करावी. शेवटच्या दिवशी हातात अक्षता घेऊन “यान्तु देवगण: सर्वेपूजामादाय पार्थिवम्। इष्टकाम प्रसिध्द्यर्थं पूनरागमनाय च॥” हा मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षता वाहणे व मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा शेतात विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहतो.

गणपती खऱ्या अर्थाने ‘गुणपती’ आहे, सर्व गुणांचा स्वामी आहे. त्या विषयीच्या अनेक कथा आख्यायिका पुराणात प्रसिद्ध आहेत.